महत्वाच्या बातम्यांवर एक नजर... जागल्या TOP 10

By  milind dhumale on 

11/08/2020

महत्वाच्या बातम्यांवर एक नजर...
#जागल्या_top_10

 

 

1 *केंद्रातील भाजप सरकारकडून आम्ही अपेक्षाच करायचे सोडले आहे. भाजपने नेहमीच शेतकऱ्यांची निराशा केली- उद्विग्न शेतकऱ्यांचा आरोप*


महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून हे आंदोलन होत आहे. युवक काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला.त्यावेळी शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली.केंद्रातील भाजप सरकारकडून आम्ही अपेक्षाच करायचे सोडले आहे. भाजपने नेहमीच शेतकऱ्यांची निराशा केली असं शेतकऱ्यांचे म्हणने आहे. 'मोदी सरकारने केलेली २० कोटींच्या पॅकेजची घोषणा किती पोकळ होती हे आता सिद्ध झाले आहे. एकाही घटकाला या पॅकेजचा लाभ मिळाला नाही. २० कोटींचे पॅकेज हा सुद्धा जुमलाच होता, हे आता सिद्ध झाले आहे. मग २० लाख कोटी रुपयांचे काय झाले? हे पैसे कुठे गेले? हे जनतेसमोर आले पाहिजे', असे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले.


2 *‘ईआयए २०२०’ मसुदा पर्यावरणाच्या मुळावर!*


केद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या ‘पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन’ (‘ईआयए २०२०’ म्हणजे एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट अ‍ॅनालिसिस) मसुद्यात विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास करण्याचे मार्ग खुले करून देण्याचा प्रयत्न केला आहे. बेकायदा प्रकल्पाबाबत सर्वसामान्य नागरिक-पर्यावरणप्रेमींना बोलता येणार नाही. या प्रकल्पांना दंड भरून मोकळे होता येईल. जनसुनवाईही होणार नाही.एखाद्या प्रदेशातील अनेक प्रकल्पांचा एकत्रित पर्यावरणावर काय परिणाम होणार, हे तपासले जाणार नाही. शासनाने ठरविले की कुठलाही प्रकल्प, कुठल्याही जागेत व्हावा, याचीच ही पायाभरणी सुरू आहे.दरम्यान,देशाच्या साधनसंपत्तीची लूट करणाऱ्या निवडक सुटाबुटातील मित्रांसाठी भाजपा सरकार काय काय करत आली आहे याचं आणखी एक भयंकर उदाहरण म्हणजे इ आय ए 2020 हा मसुदा आहे. देशाची लूट आणि पर्यावरणाचा विध्वंस रोखण्यासाठी ईआयए 2020 मसुदा मागे घ्यायलाच हवा' असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.


3 *अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे पेंढरी केंद्रावरील धान भिजले*


आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी पेंढरीमार्फत महसूल मंडळ व सोसायटीच्या मोकळ्या मैैदानात धान खरेदी करण्यात आली. त्यानंतर तेथेच धान ठेवण्यात आले. पावसाळ्यापूर्वी धानाची उचल करणे आवश्यक होते. परंतु उचल न झाल्याने तुटपुंज्या ताडपत्र्यांअभावी धान भिजले. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.एप्रिल २०२० पर्यंत एकूण १६ हजार ५०० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांना धानाचे चुकारेसुद्धा अदा केले. परंतु खरेदी केलेला धान पावसाळ्यापूर्वी उचलणे आवश्यक होते. दप्तर दिरंगाई व वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे केंद्रावरील १० हजार क्विंटलच्या आसपास धानाची उचल झाली. ६ हजार क्विंटलच्यावर धान मोकळ्या जागेत ताडपत्री झाकून ठेवण्यात आले. परंतु धान झाकण्यासाठी आवश्यक प्रमाणात ताडपत्री मिळाली नाही. तसेच केंद्रावरील कर्मचाºयांचेसुद्धा दुर्लक्ष झाले. सध्या येथील धान भिजून अंकूर फुटले आहेत. परिसरात दुर्गंधी सुटत असून नागरिकांना त्रास होत आहे. शासनाकडून धानाची खरेदी झाल्यानंतर मानवी चुकांमुळे धानाची नासाडी होते. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. कर्तव्यात हयगय करणाºयांवर कारवाई करावी, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.


4 *विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी*


विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे ९ ऑगस्ट रोजी रविवारला जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी करून महावितरणच्या धोरणाविरोधात नारेबाजी करण्यात आली. दरम्यान विदर्भवाद्यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळातील सर्वांचे वीज बिल निम्मे करा, अशी मागणी केली.विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने येथील वीज वितरण कार्यालयासमोर अवाजवी वीज बिलाची होळी केली. यावेळी समितीचे जिल्हा संयोजिक अरूण मुनघाटे, रमेश उप्पलवार, एजाज शेख आदीसह विदर्भवादी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले.


5 *परीक्षा रद्द करण्याचे अधिकार राज्यांना नाहीत*


अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. पदवी देण्याचा अधिकार फक्त विद्यापीठ अनुदान आयोगाला असताना राज्ये परीक्षा रद्द कशी करू शकतात, असा सवाल महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला.महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात निवेदन सादर केले असून करोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. याआधीच्या सुनावणीत महाराष्ट्राने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने विविध कुलगुरूंशी चर्चा केल्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन दिले होते.कुठलीही पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिली जात असेल आणि आयोगाने परीक्षा घेण्याचा आदेश दिला असेल तर, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयोगाच्या आदेशाविरोधात जाणारा ठरतो. परीक्षा झाली नाही तर पदवीही मिळणार नाही, असा कायदाच आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश रद्दबातल करता येतो का, याचे स्पष्टीकरण देण्याचे निर्देश न्या. अशोक भूषण, न्या. आर. सुभाष रेड्डी आणि न्या. एम. आर. शहा यांच्या पीठाने मेहता यांना दिले.


6 *तिरुपती मंदिर ठरलं कोव्हिडचं हॉटस्पॉट*


देशभरातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं तिरुपती बालाजी मंदिर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलं आहे. तिरुपती देवस्थानम मंदिराच्या 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.मंदिराशी संबंधित तिघांचा मृत्यूही झाला आहे.मंदिराच्या 50 पुजाऱ्यांपैकी 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 402 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरू करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी सांगितलं.


7 *स्वदेशी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आज नागपुरात देण्यात येणार*


कोरोनाचा धोका वाढत असताना एक चांगली बातमी हाती आली आहे. स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला मोठे यश मिळत आहे. महाराष्ट्रात स्वदेशी कोरोना लशीच्या चाचणीला नागपुरात सुरुवात झाली आहे. भारत बायोटेकच्या कोरोनावरील कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस आज नागपुरात देण्यात येत आहे. नागपुरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २७ जुलैला पहिल्या टप्प्यात पहिल्या दिवशी तीन जणांना पहिला डोस देण्यात आला होता. त्यानंतर सात दिवसांत ५५ स्वयंसेवकांना लस टोचण्यात आली.गेल्या १४ दिवसात त्यांची प्रकृती उत्तम असून कोणताही दुष्परिणाण दिसून आलेला नाही. त्यांचा रक्ताचा अहवाल दिल्लीला सेंट्रल लॅबकडे पाठवण्यात आला आहे.आता त्यातील सात जणांना आज दुसरा डोस देण्यात येत आहे. देशात १२ केंद्रांवर या कोव्हॅक्सिनच्या या चाचण्या होत असून५५ व्यक्तींना लस दिल्यानंतर १४दिवसांनी दुसरा डोस देण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा रिझल्ट काय येतोय याकडे सगळ्यांचे लक्ष लागेल आहे.


8 *अमेरिकेतून भारतात आलेली विद्यार्थीनी पडली छेडछाडीचा बळी, मिळाली होती 4 कोटींची स्कॉलरशिप*


उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे एक धक्कादायक घटना घडली. अमेरिकेत तब्बल 4 कोटींची स्कॉरलशिप मिळवलेली विद्यार्थी सुदीक्षा भाटीचा (Sudeeksha bhati death) सोमवारी छेडछाडीपासून वाचण्याच्या प्रयत्नात अपघाती मृत्यू झाला.सोमवारी आपल्या काकांसमवेत नातेवाईकांकडे स्कूटरवरून जात असताना बुलेटवरून काही मुलं सुदीक्षाचा पाठलाग करत होती. रस्त्यात बुलेटसवार मुलांनी सुदीक्षाची छेड काढण्यास सुरुवात केली. आरोपी युवक सतत बाइक ओव्हरटेक करत होती. त्याच दरम्यान या मुलांपासून वाचवण्याच्या नादात सुदीक्षानं अचानक गाडीला ब्रेक लावला आणि गाडी घसरली. यात सुदीक्षाचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी सुदिक्षाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे. अज्ञात दुचाकीस्वारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.दरम्यान मुलीच्या पित्याने हा अपघात नसून खून असल्याचे म्हटले आहे.पोलिसांनी आमच्या संपर्क देखील साधला नाही किंवा एफआयआर सुद्धा दाखल केली नाही.असा आरोपही करण्यात आला आहे.


9 *पंतप्रधानांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा*


लेबनॉनचे बैरुत शहर मागच्या आठवडयात शक्तीशाली स्फोटांनी हादरले. या स्फोटांमुळे सर्वसामान्यांच्या मनात सरकारविरोधात प्रचंड संतापाची भावना आहे. तिथली जनता सरकारवर चिडली आहे. हीच बाब ध्यानात घेऊन लेबनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने सोमवारी राजीनामा दिला.मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द करण्यासाठी पंतप्रधान हसन दियाब राष्ट्राध्यक्षाच्या निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री हमाद हसन यांनी दिली. बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ लेबनॉनमध्ये सरकारविरोधात मोठया प्रमाणावर निदर्शने, आंदोलने सुरु आहेत. चार ऑगस्टला बैरुत शहर दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरले. यात १६० नागरिकांचा मृत्यू झाला तर ६ हजार नागरिक जखमी झाले. असोसिएटड प्रेसने हे वृत्त दिले आहे.


10 *ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाइट हाऊस बाहेर गोळीबार; थोडक्यात बचावले*


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाला. त्यामुळे ट्रम्प यांना पत्रकार परिषद अर्ध्यावरच गुंडाळावी लागली. गोळीबार होताच सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेत कुणाला दुखापत झाली नाही. ट्रम्पही सुरक्षित असल्याचं व्हाइट हाऊसमधून सांगण्यात आलं.गोळीबार करणाऱ्या एका व्यक्तिला गोळी घालून जखमी करण्यात या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या जखमी व्यक्तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्वत: ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून व्हाइट हाऊसबाहेर गोळीबार झाल्याचं वृत्त दिलं आहे.११११११

#jaglya

#jaaglya

#जागल्या

jaaglya.com

===========================================

#Jaaglya_Top_10 नियमित अपडेट्स साठी

या लिंकवर क्लिक करून पेज लाईक करा,फॉलो करा, सी फर्स्ट करा https://www.facebook.com/jaaglyaCommunity/

ताज्या घडामोडींसाठी

https://www.facebook.com/groups/688170755078739/

जागल्या.कॉम हा ग्रुप जाईन करा

===============================================

News date 11 -08-2020

Thanks Team Jaaglya