देखा एक ख्वाब तो ये...

By  Nitin Divekar on 

माणसाने सुखाच्या, आरामाच्या, सुरक्षिततेच्या शोधात सभ्यता, संस्कृती आणि तंत्रज्ञान विकसित केले. माणसाने कष्ट कमी करणारी, वेळ वाचवणारी व्यवस्था आणि उपकरण निर्माण केली. शेतीचा, चाकाचा शोध लावला. गाव, शहर, महानगरं, राज्य, राष्ट्र निर्माण केले. वर्ग आणि जातीव्यवस्था निर्माण केली. पण तरीही माणसाच्या सुखाची, आरामाची, सुरक्षिततेची भूक काही कमी झाली नाही. जास्तीच्या हव्यासातून तो इतरांचा द्वेष करू लागला. जास्त प्रतिष्ठा, जास्त ताकत, जास्त संसाधनांच्या शोधात माणूस माणसाला गुलाम करू लागला, माणसाचं आणि निसर्गाचं शोषण करू लागला. औद्योगिकरणाच्या उदयानंतर माणसाचा हव्यास प्रचंड वाढला. असेंम्बली लाईनच्या माध्यमातून तो प्रचंड वेगाने वस्तूंची निर्मिती करू लागला. त्याने वेगाने प्रवास करण्यासाठी चारचाकी गाडी आणि विमानाचा शोध लावला. आता बुलेट ट्रेन असूनही माणसाला हायपरलूप हवी आहे. माणसाचा जास्तीचा हव्यास वाढतच आहे. माणसाला नेहमी काहीतरी अधिक हवं असत. कधी काळी ६४ kbps असलेला इंटरनेट स्पीड आज १ gbps झाला आहे तरी तो आम्हाला कमीच आहे. १०-१२ mb पासून सुरू झालेला फोन स्टोरेज आज १ टीबी पर्यंत गेलं आहे. ५१२ mb रॅमचा प्रवास ६-८gb रॅम पर्यंत झाला आहे. १.२ mp फोन कॅमेरा आता ६४ ते १२८ mp पर्यंत पोहचला आहे. मोठ्या स्क्रीनवाला टीव्ही पाहिजे. आता 4k नंतर आता 8k वाला टीव्ही पाहिजे. आपण सुसाट वेगाने प्रवास करत आहोत.इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मीडियाच्या काळात आपण सुसाट वेगाने विचार करत आहात. रोज कानावर, डोळ्यांवर, मेंदूवर आदळणाऱ्या प्रचंड बऱ्या, वाईट माहितीची प्रोसेसिंग करण्यास, मल्टी टास्किंग करण्यास एक माणूस म्हणून आपण अपुरे आहोत हे आपण विसरून जारो. त्यातूनच जगण्यात स्ट्रेस वाढला आहे. आपला जास्तीचा ध्यास, वेगाचा अट्टाहास आपल्या जीवनातील दुःखाच मुख्य कारण आहे. आपलं पर्यावरण आणि ईतर प्राणी हळू हळू उत्क्रांत होत असताना आपण तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्क्रांतीचे नियम डावलण्याचा प्रयत्न करत आहोत. पण या सगळ्या उपद्व्यापात आपण आपली मनःशांती गमावून बसलो आहोत. ज्या सुखाच्या, आरामच्या, सुरक्षिततेच्या हव्यासापायी माणसाने हा सगळा पसारा मांडला ते सुख, ती सुरक्षितता आणि आराम अजूनही त्याच्या मनाला लाभत नाहीये. माणसाने आता slow down व्हायला हवं.

आज सकाळी दातांना ब्रश करताना मनात सुरू असलेला हा गोंधळ अचानक लक्षात आला. आज रविवार असल्यामुळे वर्क फ्रॉम सुद्धा बंद आहे. लॉकडाऊनमुळे कुठेही बाहेर जाण्याची घाई नाहीये पण तरीही मी वेगाने दात घासत होतो. आपण एवढ्या वेगाने दात का घासतोय? आपण एवढ्या वेगाने कुठे चाललो आहोत असा प्रश्न मनात निर्माण झाला आणि क्षणात मनातला सगळा वेग कमी झाला. आपल्या मनातील विचारचक्र अभिमन्यूला अडकवणाऱ्या चक्रव्युहापेक्षा कमी नाही. विचारचक्रात अडकलेला माणूस आपोआप त्या विचारांच्या सुसाट वेगात अडकतो. तो विचारात एवढा अडकतो की विचारांनाच सत्य समजू लागतो. त्याला विचार खरे वाटू लागतात. तो त्या विचारांना प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो. विचार एक मृगजळ आहे. पण ज्या प्रमाणे वाळवंटात हरवलेला प्रवासी मृगाजळाला खरं समजून पाण्याच्या शोधात भरकटुन जातो तसा माणूस सुद्धा सुखाच्या, आरामच्या, सुरक्षिततेच्या शोधत विचारांना खर समजून त्यांचा पाठलाग करू लागतो. महागडा मोबाईल, गाडी, सगळ्या सुखसुविधांनी युक्त मोठं घर, मोठी प्रतिष्ठा, आपली स्तुती करणारे दोन चार लोक यांच्यापासून आपल्याला सुख, आराम, सुरक्षितता लाभते अस माणसाला वाटत. पण हा केवळ त्याचा विचार आहे. विचार आणि सत्य यातला फरक न समजल्यामुळे माणूस विचारांच्या मागे धावत आहे. विचारांच्या मागे धावणं थांबलं तरच खर सुख, समाधान माणसाला लाभू शकत. हे लक्षात आल्यानंतर माझ्या डोक्यातल विचारचक्र, एक अनामिक घाई, स्ट्रेस सगळं काही निघून गेल्यासारखं वाटत आहे. मनं शांत शांत झालय. खूप दिवसांनी अशी शांतता मनाला लाभली आहे. सुख, आराम, सुरक्षिततेचा हव्यास म्हणजे केवळ मनात निर्माण होणारे क्षणभंगुर विचार आहेत. त्या विचारांचा पाठलाग करणे म्हणजे सुखाला, समधानाला मुकणे. हातच सोडून धावत्याच्या मागे पळणे. धावत्याच्या मागे पळणे थांबले की खऱ्या अर्थाने सुख, समाधान लाभत. आज मला खुप प्रसन्न वाटतंय. सगळी धावपळ थांबून आपल्या आसपासच जग अचानक स्लो झाल्यासारखं वाटतय. जणू स्वित्झर्लंडला पोहचलोय. अमिताभ आणि रेखाच गाणं आठवतंय का? "देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए..." त्या गाण्याचा जो मूड आहे ना सध्या तोच सध्या माझ्या मनाचा मूड आहे. बुद्ध आज चिमुटभर का होईना पण पट्टीसेनासारखा खऱ्या अर्थाने समजला.

Wish You all a very Happy Sunday.
💐💐💐💐💐