भीमा कोरेगांव ची लढाई आणि काही प्रवाद समजून घ्या

By  milind dhumale on 

भीमा-कोरेगांव महारांच्या अफाट शौर्याचा इतिहास,यत्किंचितही देशद्रोह नसून जाज्वल्य उच्चकोटीची देशभक्तीच

१ जानेवारी हा भारतातील तमाम मागासलेल्या चिरडल्या दाबले गेलेल्या बहिष्कृतता लादल्या गेलेल्या आणि १९५६ नंतर चिवटपणे झुंज देत आपलं नव जग नवी ओळख निर्माण करणाऱ्या तमाम जातींसाठी अभिमानाचा शौर्य दिन.


ज्यांच्या कमरेला ज्ञानाच्या किल्ल्या होत्या त्यांनी आपल्याच जातीचं गुणगान गाणारा आणि काहींची त्रोटक दखल घेणारा इतिहास लिहिला.जे शुद्र आहेत दखलपात्र नाहीत ज्यांना अनुल्लेखाने मारायचे त्यांचा इतिहासात कुठेही उल्लेख न करणे हे भारतात नैसर्गिक.

त्यातून मग सिंधूला हिंदू असा अपभ्रंशही चिकटवला जातो.हे ओघानं आलंच.
अलिकडे आपल्याकडे अतोनात गंमतीजंमती होत असतात.कधी आपल्याकडे अस्पृश्यताच नसते,कधी इंग्रजांनीच आपल्यात फुट पाडण्यासाठी जाती निर्माण केल्या असल्याचे मांडले जाते कधी शिक्षण सर्वांना मिळत होते.अशा निखालस थापा मारून सत्याचा अपलाप करून वस्तुस्थिती आणि आपली पापं झाकण्याची केविलवाणी धडपड इथले बुद्धीभेदी करत असतात ते केवळ सनातनी ब्राह्मणच नाहीत तर ब्राह्मणेतरही यात आघाडीवर आहेत.

त्यामुळे भीमा-कोरेगांवची लढाई त्यात मिळविलेला “जय” हा केवळ एका जातीचा इतिहास ठरतो अन तोही अदखलपात्र होऊन जातो.तो तत्कालीन मराठेशाहीतील मराठ्यांच्या अपमानाचा बदला ठरत नाही.कारण इथं जात आडवी येते.आणि म्हणून आपल्याकडे बाजीप्रभू देशपांड्यांची पावनखिंड अभ्यासाला लावली जाते.हिरकणी गडावरून उतरते तानाजी घोरपडीच्या सहाय्याने कोंढाणा सर केला अशी दंतकथा शौर्य म्हणून अभ्यासाला लावले जाते.

मात्र महारांचा अतुलनीय इतिहास अभ्यासाला येत नाही.नागेवाडी वाई येथील महा+अरि = नागनाक महार पाटलाने मोगल सम्राटांकडून जिंकून दिलेला वैराटगडाचा इतिहास अभ्यासाला येत नाही.जेव्हा कुणीच पुढे येत नव्हतं तेव्हा जीवाचा धोका पत्करून छत्रपती संभाजी राजांचं पार्थिव गोळा करून त्यावर अश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केलेला पहेलवान गोविंद महार अभ्यासाला येत नाही.जात्याभिमानी जात गंड बाळगणाऱ्या सर्वांच्याच ते गैरसोयीचं असतं.

हल्ली भीमा-कोरेगांवची लढाई म्हणजे देशद्रोह.भीमा-कोरेगांवची लढाई झालीच नाही. भीमा-कोरेगांवची लढाई जिंकलीच नाही.इथपासून भीमा-कोरेगांवच्या लढाईत केवळ महार सैन्य नसून मराठा चर्मकार कोळी धनगर वगैरे जातीही होत्या असेही मांडले जातेय.हे सगळेच आपल्या परीने करत आहेत आता केवळ सनातनी ब्राह्मण नाही तर ब्राह्मणेतर जातीही यात अग्रभागी आहेत.

भीमा-कोरेगांव लढाईचा इतिहास इंग्रजांनी लिहिला म्हणून तरी ते आपल्याला माहित झालं नाहीतर अशा कितीतरी शौर्यगाथा आजही वाचा फुटण्याची वाट पहात असतील.किंकेड चार्लस अन पारसनीस यांनी संपादित केलेलं हे पुस्तक ब्रिटीश स्कूल ऑफ मिलिटरी मध्ये अभ्यासाला आहे. या लींकवर ते मोफत वाचता येईल.,https://archive.org/details/historyofmaratha03kincuoft Volume 3 Publisher London, MilfordPages 294 पान क्रमांक २१४-२१६वर भीमा-कोरेगांव लढाईचा संदर्भ वाचता येईल.

५०० महार सैनिक लढले हे खरे आह.२८ हजार पेशव्याचं सैन्य होतं हेही खरं मात्र हे सगळेच कापले गेले नाहीत.हजारो मारले गेले असतील त्यातून अनेकांनी पळून जावून आपला जीव वाचवला.यशस्वी माघार आणि लढाई जिंकली यात महार सैनिक आणि इंग्रज अधिकारीही मारले गेले.

मुळात एक कसोटी लक्षात घेतली पाहिजे की हे देशद्रोह देशभक्ती राष्ट्भक्ती हे सगळं भंपक आणि टाकाऊ थोतांड आहे.असं आपल्या देशात त्या त्या काळी कधीच अस्तिवात नव्हतं.त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना जसे परकीयांच्या विरुद्ध लढावे लागले तसे इथल्या मराठा ब्राह्मण सरदार लोकांशीही लढावे लागले आहे.उलट सर्वात जास्त त्रास हा स्वकीयांनी राजांना दिलेला आहे.त्यासाठी तह करावे लागले आहेत.हि वस्तुस्थिती आहे.

हे सगळे त्रास देणारे पवित्र देशभक्त होते काय? त्यांची देशभक्ती देशनिष्ठ कोणत्या ग्रहावरील देशाला समर्पित होती? इंग्रजांच्या सैन्यातून लढले म्हणून पेशव्यांना हरवणे म्हणजे देशद्रोह वाटतो त्याच पेशव्यांनी याच इंग्रजांना प्रथम आवतान देवून इथं पाय रोवण्यास जमीन दिली हे किती भोळ्याभाबड्या देशप्रेमी लोकांना माहित आहे?

भारत देश कधीच एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता.त्यासाठी एक उदाहरण पुरेसे ठरणारे आहे. इसवी सन १७५५ साली याच पेशव्यांनी मराठ्यांचे आरमार बुडवण्यासाठी इंग्रजांची मदत घेतली होती.

म्हणजे कधी?

तर १८१८ ची भीमा-कोरेगांवची लढाई होण्याअगोदर तब्बल ६३ वर्षे अगोदर. परकीय इंग्रजांना सोबत घेऊन स्वतःच्याच राज्यातील हिंदू धर्मीयांचे राज्य हिसकावून घेण्याचे प्रकार तेव्हा चालत होते.

याचा अर्थ तेव्हा ‘भारत’ हा देश एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात नव्हता, हे यावरून निर्विवादपणे सिद्ध होते.पेशव्यांनी सत्ता हातात येताच छत्रपतींचा शक बंद करून मोगलांचा फसली शक सुरु केला.पुढे इंग्रजांची मदत घेऊन मराठ्यांचे राज्य बुडविणे देशप्रेमाचा उत्कट नमुना आणि तेच इतरांनी केलं की देशद्रोह?

असले कावे आपल्याकडे हरएक जण खेळत आला म्हणून आपण देश म्हणून एकत्र असलो तरी राष्ट्र म्हणून कधीच एकत्र आलो नाही येवूही शकत नाही.असो.इतिहासात रमण्यात कुणाला स्वारस्य असू नये.जो इतिहासात रमतो त्याचा भूतकाळ अंधकारमय होतो.

खरेतर १९६० च्या नंतरचा सगळाच इतिहास अभ्यासक्रमातून कायमचा बाद केला पाहिजे.आपण वर्तमानातील प्रश्न काय परिस्थिती काय यावर लक्ष केंद्रित करून भविष्याचा वेध घेतला पाहीजे. पेशव्यांचे राज्य घालवले आणि शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.म्हणून त्यास त्वेषाने जितम् जितम् म्हणण्यात आज अर्थ नाही.आजची तरुण पिढी विवेकवादी आहे.

आज भीमा-कोरेगांवला एकवही एक पेनचा उप्रकम सुरु आहे.हे मला जास्त आश्वासक आणि महत्वाचं वाटतं.गतइतिहासात प्रत्येक जात प्रत्येक जातीविरुद्ध लढली आहे.आपण आज वर्तमानात आहोत.सर्वाना सोबत घेऊन समतेचा शांतीचा मार्ग चोखाळूया हीच त्या शुरविरांना खरी आदरांजली ठरावी _/\_

जयभीम,जय भारत, भारतीय संविधान चिरायू होवो !!

- मिलिंद धुमाळे 

 

bhima koregaon mahar peshwa battle

bhima koregaon mahar peshwa battle