गणपती बसवणारे बौद्ध आणि विवेकवाद

By  milind dhumale on 

प्रबोधन टीका आणि द्वेष अन टिंगलटवाळी या प्रत्येकात भेद आहे.

प्रबोधन करणं काळानुरूप बदलावं लागतं.जसे वातावरण असते तसे तुम्हाला तुमचे शब्द पेरावे लागतील.युध्द काळात प्रबोधन कामी येत नाही हेही लक्षात घेतलं पाहिजे.तिथं फक्त कृतीच कामी येते.


आजचा आंबेडकरी तरुण काहीसा सैल झालाय.बेसावध झालाय.तो लांबवर विचार करत नाही असे दिसते.त्यामुळे तत्कालीन घटनांमध्ये तो इंस्टंट प्रतिक्रियावादी झाला आहे.हे त्याने टाळले पाहिजे.पुढे तो टाळेलही.असा मला विश्वास आहे.


अलिकडे काय झालं आहे की छोट्या छोट्या पोस्ट अन त्यावर येणारे लाईक यामुळे दीर्घ लिहिणे थांबत चालले आहे.आताशा दीर्घ मांडणी करणारे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे उरलेत की काय अशी शंका येते.


यामुळे काय होतं? तर,जेव्हा तुम्ही दीर्घ मांडणी करता तेव्हा तुम्हाला अगोदर अभ्यास करावा लागतो.मुद्दे नीटपणे घोटून घ्यावे लागतात.तुमच्या मुद्यांना उचित संदर्भ द्यावे लागतात.मांडणी अपील असणारी अन ती एखाद्या गोष्टीचे मुद्याचे सार काढणारी कनक्ल्यूजन पर्यंत पोहोचणारी असावी लागते.त्यात मेहनत आहे.कष्ट आहे.वैचारिक बैठक अन विचारांची खोली असावी लागते.


याउलट छोट्या पोस्ट शेरेबाजी याला फारकाही करावं लागत नाही. त्यामुळे कष्ट करण्यापेक्षा सोप्या सोयीच्या गोष्टी लवकर केल्या जातात हे खरं पण त्याचे परिणाम गंभीर असतात.अन हे सगळं टीका आणि प्रबोधन या अनुषंगाने बोलतो आहे.


आपले प्रबोधनकार हिंदूंच्या सणांना अंगात बुद्ध आंबेडकर आणून असं काही प्रबोधन सत्र सुरु करतात की समोरचा समाज प्रचंड दुखावून जखमी होतो.म्हणजे हिंदू समाजातील लोकांच्या अंगात देव येत असतील तर आमच्या अंगात बुद्ध-फुले-आंबेडकर क्रमाने येतात.भयंकर प्रकार सुरु झालाय हा.


बुद्धाने अज्ञानाचे खडक फोडून शेत तयार केलं खडकाळ जमिन सुपीक केली.फुले-शाहू-आंबेडकर यांनी त्यात समतेचं पिक घेतलं. त्यातून पिढ्या घडल्या.आता फक्त राखण करायची आहे.तुम्हाला नवं काही करायची गरज नाही.सगळं आहे.फक्त नीटपणे घेऊन जायचं आहे.पण भानावर राहून.


आजचा तरुण जर बुद्धाच्या काळात असता अशोकाच्या काळात असता तर तो तत्कालीन समाजाला शिव्याशाप दुषणे देत बसला असता.अन त्याचा फटका बौद्ध धम्माच्या प्रसाराला बसला असता.ना त्याला राजाश्रय मिळाला नसता ना तो देश विदेशात प्रसारित होऊन रुजला असता.


त्यांनी प्रेमाने जग जिंकलं.अशोकाच्या काळात भारत बौद्धमय होता.परंतु सगळेच शंभर टक्के बौद्ध विचारांचे होते का? असतील का? अर्थातच नसणार.जगात कुठेही असे घडत नाही.कधिही घडणार नाही.दुसऱ्या विचाराचे लोक तुमच्यासोबत असणारच.त्यांच्याशी कसा व्यवहार करायचा हा तुमचा मुद्दा असला पाहिजे.


बुद्धाने चुकीचं कोण हे सांगण्यापेक्षा ,बुद्धाने बरोबर काय हेच सतत सांगितलं आहे.आपली रेघ मोठी मोठी करत गेले बुद्ध ती एवढी मोठी झाली की पृथ्वीवर त्यांच्या विचाराचे अगणित लोक झाले.हे आपलंच आहे.दुसऱ्या कुणाचं नाही,मग हे आपलंच आपण का लक्षात घेत नाही?


आपण एक लक्षात घेतलं पाहिजे लेण्या कोरणारे पहाड खोदून शिल्प घडवणारे कोण होते?  ते बौद्ध होते का? शक्यता नाही.ते आदिवासी,वडारी त्यांना धर्म सुद्धा नसेल.जेव्हा बुद्ध विचार समजला त्यांनी तो अनुसरला.ते बुद्ध झाले असतील नसतीलही पण लेण्या कोरणारे मोठ मोठ्या बुद्ध मूर्ती पहाडाची छाती फोडत कातळ कोरणारे हे वडारी पाथरी आदिवासी असले पाहिजेत ती कला त्यांच्याकडे होती.पुढे ते दीक्षा घेऊन भिक्खू सुद्धा झाले असू शकतील.


हे कसं शक्य झालं असेल? याचा आपण कधी विचार केला? एक गोष्ट तर खरी आहे ना की जेव्हा बुद्ध विचार नव्हता तेव्हा काहीतरी दुसरं होतं किंवा बुद्ध विचारांचं असं काही नव्हतं. मग बुद्ध विचार स्विकारण्यासाठी त्यांना जोर जबरदस्ती केली गेली का?


त्यांना तुम्ही मूर्ख आहात वेडे आहात अंधश्रद्धाळू आहात असं कुणी बोललं असेल का? बुद्धिझमचा अभ्यास करताना माझ्यातरी वाचनात असं काही आलेलं नाही.या उलट लोकांचे प्रश्न विवेकाने सोडवणारे त्यांना त्यांच्या "सम-जावून" समजावून सांगणारे प्रसंग वाचायला मिळतात.


अनेक ठिकाणी तर भगवान बुद्ध आणि त्यांच्या भिक्खू संघाला शिव्या देणारे त्रास देणारे लोक आपल्याला दिसतात अन अशावेळी मात्र आपल्या ध्येयापासून सम्यक आचार सम्यक विचार यापासून न ढळणारे बुद्ध अन त्यांचा भिक्खू संघ दिसून येतो.


धर्म ही आपली वैयक्तिक खाजगी बाब आहे,ती आपल्या घरात,घराच्या उंबऱ्या बाहेर यायला नको असा दंडक आपणच आपल्याला घालून घेतला पाहिजे.


तसं न केल्याने आपण टीकेचे पात्र होतो.द्वेषाचे धनी होतो.हिंदू सणांना २२ प्रतिज्ञा आवर्जून टिमकी वाजवणारे अशाच प्रकारात आहेत.बरं हे सगळं करत असताना प्रबोधन करताय की द्वेष करताय याचे भान नको का बाळगायला?

क्रांती प्रतिक्रांती आपल्याला माहित आहे.मग समजा क्रांती झालीय तर तुम्हाला प्रतिक्रांती करावी लागेल.प्रतिक्रांती झाली असेल तर पुन्हा क्रांती करावी लागेल.सणवार सार्वजनिक असतात आणि त्यांचा आवाका मोठा असतो.तो अशा टीकेने बदलत नाही.

तुम्हाला बदल करायचा असेल तर तो मोठ्या स्तरावर आणि व्यापक असला पाहिजे.ही पहिली कसोटी लक्षात घेणे गरजेचे आहे.

क्रांती प्रतिक्रांतीचं एक उदाहरण पाहा.दरवर्षी सहा डिसेंबर या दिवशी म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी कोटींची पुस्तके विकली जातात.त्याचे आकडे दरवर्षी येतात आणि आपल्याला अभिमान वाटतो.परंतु गेल्या दहा वर्षात आणखी एक प्रतिक्रांती सुरु झालीय.मुंबईच्या प्रत्येक रेल्वेस्टेशनवर भगवत गीतेची विक्री जाणीवपूर्वक केली जाते.हरे रामा हरे कृष्णा मंडळ इस्कॉन वाले.हे लोक या गोष्टी करत आहेत.त्यांच्यासोबत इंग्रज लोकही असतात.तोही एक जाहिरातीचा आणि मनावर ठसवण्याचा एक प्रकार आहे.जेणेकरून भारतीयांना त्यात इंटरेस्ट वाटावा.हे प्रकार नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत सुरु असतात.आणि चक्क अर्ध्या किमतीत म्हणजे 50% सवलतीत भगवत गीता विकली जाते.

हे सगळं ते शांतपणे करतात.ते कधिही महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोलत नाहीत.बुद्ध आंबेडकर यांवर टीका करत नाहीत.ते आपली रेघ मोठी करण्याचा प्रयत्नात आहेत.ते आपला विचार सुप्तपणे रुजवण्यासाठी धडपडत आहेत.हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.आपण सणांच्या दिवशी असं काही केलं आहे का?

मानव हा उत्सवप्रिय प्राणी आहे.त्याला सणवार आवडतात.त्यांची टर्मिनॉलॉजी काय याच्याशी त्याला देणेघेणे नाही.आजच्या पिढीला ज्यांना कशाशी देणेघेणे नसते त्यांना त्यामागच्या अजेंड्याशी देखील देणेघेणे नसते.त्यांना फक्त उत्सव करायचा असतो,अन दुसरं मानसिक समाधान.यासाठी मोठं काम करावं लागेल,तुम्हाला तक्रार करत टीका करत न बसता कार्यक्रम द्यावा लागेल,लोकांना व्यस्त करावं लागेल,लोक एंगेज झाले की ते यातून हळूहळू बाहेर पडतील.हे काम अवघड आहे.वेळखाऊ आहे.पण याला पर्याय नाही.

आंबेडकरी समाज म्हणजे आदर्श समाज.आंबेडकरी समाज कधी गलिच्छ भाषा वापरत नाही.आंबेडकरी समाज कधी शिव्या देत नाही.आंबेडकरी समाज कधिही इतर समाजाला कटूता वाईट भाषा वापरत नाही.असं चित्र आपल्याला इतरांनी दाखवलं पाहिजे.जगाला विचार देणाऱ्या महापुरुषांचे आम्ही अनुयायी आहोत.आम्ही आदर्श आहोत.हे तुम्हाला कृतीतून दाखवून द्यावं लागेल,हे तुम्हाला येत्या काळात समाजात उभं करून दाखवावं लागेल.


तुम्ही शिव्या द्याव्यात तुम्ही सतत भांडत राहावं म्हणून अनेक लोक तुम्हाला प्रोवोक करत असतात.सतत.त्यांना तुम्ही त्यांच्या पातळीवर आलेलं पाहायचं असतं.विचार करा.ज्या समाजाला शिक्षण मिळत नव्हतं तो समाज आज शिक्षण क्षेत्रात मक्तेदारी करतोय.इतरांना शिक्षण घ्यायला शिक्षण संस्था उभारतोय.हे आपले आदर्शवत वर्तन आणि धोरण आहे.हे रुजण्या ऐवजी अलिकडे सोशल मिडीयाने समाजाची पत धुळीस मिळवणे सुरु केले आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही.यातून लवकर बाहेर पडूया.


एक लक्षात घ्या.श्रद्धा उपासनेचे अधिकार आपली राज्यघटनाचा सर्व जाती-धर्मांना देते.फक्त मुस्लिमांचा ईद मोहरम तेवढा विज्ञानवादी एवढा की सण त्यांचा आहे की आपला असा संभ्रम यावा एवढ्या वरचढ शुभेच्छा अन हिंदूंचे सण मात्र अंधश्रद्धा असं धोरण तोडून बाजूला सारा.सर्वांना समान ठेवा.समान वागा.असं आपलं वर्तन असलं पाहिजे.


या देशात धार्मिक विविधता आहे.हे वास्तव आहे.आणि तुम्हाला सर्वांच्याच सोबत पिढ्यान पिढ्या इथच जगावं लागणार आहे.हे करत असताना.आपल्या विचारांशी प्रतारणा न करताही अनेक गोष्टी करता येवू शकतात.

 

दरवर्षी एक नवीन गोष्ट समोर येते, अमुक तमुकने गणपती बसवला.जाब विचारा,खडसावा त्याचे फोन नंबर वायरल करा आणि हेही कमी झालं तर धमक्या द्या,काहींची मजल तर बहिष्कार टाकण्यापर्यंत जाते.हे सगळं मॉडेल आंबेडकरी आहे का? हा बुद्धिझम आहे का?

याचा आपण विचार कधी करणार आहोत?

नंबर वायरल करणे आणि धमक्या देणे ही सनातनची मोडस ऑपरेंडी आहे.ती आपण कधी आणि का ऍडॉप्ट केलीय? कशाला केलीय? कधीकाळी आपणच या बहिष्काराचे बळी होतो.बहिष्कार हा शब्ददेखील इतरांसाठी आपण उच्चारणे फार क्लेशदायक आहे.त्याची झळ आजही गावखेड्यातील विविध समाज गट भोगत आहेतच.हिंदू मातंग असला हिंदू चर्मकार असला तरी मंदिरात गेल्याने त्यांना मारहाण अन बहिष्काराच्या घटना घडल्यात

लोक श्रद्धा का ठेवतात? उपासना का करतात याचा मानसशास्त्रीय अभ्यास आपण कधी केलाय का? लोकांना ती गरज का वाटते? त्यातही शिकलेले म्हस्के सारखे प्राध्यापक लोकही अशा गोष्टी का करतात? एकतर त्यांना विज्ञान समजलेलं नसतं.त्यात जर व्यक्ती बौद्ध असेल आंबेडकरी असेल तर त्यांनाही विचार समजलेला नाही.असं म्हणावं लागेल.

भाऊ कदम असो की म्हस्के त्यांना त्यांच्या आचार विचारांचे स्वातंत्र्य आपण दिले पाहिजे.

अशा लोकांचे समर्थन करण्याचा बिलकुल प्रश्न नाही.परंतु आपण विरोध करताना तारतम्य बाळगले पाहिजे.

कारण बुद्ध स्वत: म्हणतात की कुणालाही शरण जाऊ नका.अगदी मी म्हणतो म्हणूनही विश्वास ठेवू नका.तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर गोष्ट तपासून पाहा आणि पटली तरच तिचा स्विकार करा.हा माझा विचार आहे म्हणून तो तुम्ही स्विकारलाच पाहिजे असे नाही.एवढं स्पष्ट आणि सोप्या  पद्धतीने जगण्याचे सार सांगणारा शिकवण देणारा बुद्ध जर तुमच्याकडे आहे.

तुम्ही त्याचे अनुयायी आहात तर मग त्याची शिकवण आपण आपल्या आचरणात का आणत नाही? ज्यांना बुद्धीच नाही.किंवा तिचा वापरच करायचा नाही.अशा लोकांना तुम्ही कितीही समजावून सांगितले तरी ते ऐकणार नाहीत.त्यांना जर कर्मकांड अंधश्रध्दा यातच अडकून राहायचं असेल तर त्यात त्यांचेच नुकसान आहे.तुमचे नाही.

त्यामुळे मला वाटतं अशा लोकांना बोलण्यात आपण वेळ दवडू नये.ते आज ना उद्या त्यातला फोलपणा पाहून बाहेर पडतील,किंवा असं समजू की पडणार नाहीत.मग अशा गोष्टीत अडकून आपण काय सिद्ध करतो? या उलट आपण आपले विचार त्यांच्यावर थोपवू पाहतो असं वाटतं.कधी कधी मलाही प्रचंड राग येतो.तुम्हाला घाणीतून उचलून स्वच्छ केलं सुंदर आयुष्य दिलं आणि पुन्हा तुम्ही त्याच घाणीत लोळायला आतुर होता असं मलाही अशा लोकांबद्दल वाटतं.पण ते फक्त आपल्यापुरते ठेवावे लागेल.कारण त्याने चिडून वैतागून काहीच होत नाही.बदल घडत नाही.बदल घडण्यासाठी शांतपणे काम करत रहावं लागणार आहे.

फारतर अशा लोकांना समाजाकडून जो मानपान सन्मान मिळतो त्याबद्दल विचार करता येईल.तुम्ही प्रागतिक विचारांचे पाईक असल्याचे फायदे उपटू शकत नाही.तिथं मिरवून घेऊ शकत नाही तसे काही तुम्हाला करता येईल,परंतु तेही फार सुप्तपणे,आकंडतांडव न करता. 

या सगळ्यात एक गोष्ट अशी की तुम्हाला तुमच्या विचारांचे ज्यांना समविचारी म्हणतात असे लोक वाढवावे लागतील.कारण देशात हिंदुत्वाचे वारे आहेत.अनेकांची मतिभ्रष्ट आहे. अनेकांना हिंदुत्ववादी विचारांचे आकर्षण निर्माण झाले आहे.किंवा तो विचार आता पटू लागला आहे.अशा लोकांना तुम्हाला योग्य विचार योग्य मार्ग दाखवता आला पाहिजे.

हिंदुत्ववादी अफूची नशा काहीकाळ राहणार आहे.नोकरी रोजगार शिक्षण आरोग्य हे विषय त्यामुळे मागे पडत चालले आहेत.जेव्हा नशा उतरेल तेव्हा यागोष्टींची किंमत कळेल अन चटके बसायला लागतील.म्हणून तुम्हाला समविचारी लोकांची गरज आहे.तुमचं सर्कल मोठं करा.तुमचा मित्रपरिवार वाढवा.प्रेम मंगल मैत्री वाढवा.

हे टिंगल टवाळी द्वेष भांडण करत होणार नाही.त्यामुळे लोक आणखी दुरावत जातील.

बुद्ध मंगल मैत्री शिकवणारा पहिला शिक्षक आहे.त्याच्या शिकवणीनुसारच तुम्हाला जावं लागेल.सम्यक बुद्ध पेरावा लागेल !