संविधान,गणपती,तरडे आणि आंबेडकरी तरुण

By  milind dhumale on 

थोडं डिटेल


गणपतीत समजा देखावा म्हणून संविधान ठेवलं तर कुणाचा आक्षेप असेल का?


उत्तर - बिलकुल नाही.


हे स्पष्ट उत्तर आहे.
याउलट कित्येक वर्षापासून हा मुद्दा गणपती मंडळानी कधिच पुढे आणला नाही,नपेक्षा कालच्या मानसिकतेप्रमाणे संविधान म्हणजे दलितांचे काहीतरी आहे.राज्यघटना डॉ.आंबेडकरांनी लिहिली म्हणून ती सुद्धा दलित अस्वीकार्य अशा बथ्थड मानसिकतेच्या अवलादी देशात आहेतच.संविधान जाळणारे सुद्धा आहेत.


याउलट मी म्हणेन गणपतीच्या देखाव्यात संविधान आणि नागरिकांची कर्तव्ये असली पाहिजेत तशी सक्तीच असली पाहिजे.कारण आपल्याला सत्तर अधिक वर्षे होऊनही अजून त्याबद्दल नीट माहिती नाही.


तरडेच्या प्रकरणात मुद्दा नेपथ्याचा आहे.त्यातून देण्यात येणाऱ्या मॅसेजचा आहे.मागच्यावेळी पुण्यातल्या कार्यक्रमात संघाने जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज साईबाबा टाईप हाताने आशिर्वाद देताना दाखवले होते.
त्यावेळी सगळ्याच जाती धर्मातील लोकांनी त्याला विरोध केला होता.तो का तर त्यातून संघ जो संदेश देवू पाहात होता तो बहुजनांच्या लक्षात आलेला.


परंतु इथं आणखी एक तिढा असा आहे की बहुजनातही सत्तेची असूया आहे.ती फक्त राजकीय नाही तर सामाजिक सांस्कृतिक सुद्धा आहे.बहुसंख्येच्या जोरावर ती इतरांवर लादली जातेच.म्हणून भय्या पाटील टाईप मानसिकता संघातील व्यक्तीच्या चुकीच्या गोष्टीनाही अप्रत्यक्ष समर्थन देण्याचे उद्योग करतात आणि त्यातून विरोध बोथट करण्यासाठी धडपडत असतात..


गंमत अशी की हा जी लाईन मांडायचा प्रयत्न करतोय की मोदी शहा संविधानाची पूजा करून वाट लावत आहेत,तेव्हा तुम्ही गप्प बसता वगैरे त्यात गंमत अशी की मुळात तरडे सुद्धा याच मोदी शहाच्या संघाचा माणूस आहे.


नुसता समर्थक वगैरे असा काठावर नाही तर अधिकृत स्वयंसेवक.अन आणखी मोठी गंमत अशी की छत्रपती संभाजीराजे याच भाजप सोबत असतात आणि उदयनराजे भोसलेही याच भाजपचे असतात.म्हणजे विरोधातही आम्हीच असणार आणि समर्थनातही आम्हीच असणार दोन्ही बाजूला आम्हीच, चित भी मेरी पट भी मेरी.
 


तर दुसरीकडे डाव्या विचारांचे समर्थक नेहमीप्रमाणे प्रतिगामी भूमिकेत जातात विरोधकांना अंधभक्त ठरवून टाकतात.ही एक "संधी" म्हणून पुन्हा आंबेडकरी चळवळ अन तिच्या अनुयायांना झोडपून ओर्ग्याझम शांत करून घेतात.


काल या घटनेच्या अनुषंगाने आमचे मित्र आनंद शितोळे यांनी तरडेवर गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेतली आहे.आणि असे अनेक समविचारी लोक आहेत.ज्यांनी अशी उघड भूमिका घेतली आहे.रूढार्थाने ते आंबेडकरवादी नाहीत (परंतु ते आंबेडकरी आहेत असं मी मानतो .कारण जो समता स्वातंत्र्य बंधूता मानतो तो आंबेडकरी आहे असं माझं मत आहे.जन्माने आंबेडकरी असणं मी मान्य करत नाही.तो विचाराने असला पाहिजे. )


त्यामुळे ही फक्त आंबेडकरी अनुयायांची भूमिका आहे का? तर बिलकुल नाही.मग डाव्याना आंबेडकरी चळवळीवर शरसंधान साधायचं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतो.माझं अनेक वर्षापासूनच असं निरीक्षण आहे की आंबेडकरी चळवळ आणि विचार याची सर्वात जास्त बदनामी कुणी केली असेल तर ती या अर्धवट डाव्या बाल कॉम्रेड्सनी.


हिंदुत्ववादी या उलट वागतात ते सगळं हायजॅक करायला बघतात.त्यातूनच बुद्धाला विष्णूचा अवतार घोषित करणे अन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संघात आले.चर्चा करत होते वगैरे फालतू थाप मारल्या जातात.सगळं आमचंच असं दाखवलं जातं अन संपवलं जातं तर हे डावे सगळं चुकीचं भावनिक अंधभक्ती असं म्हणत मोडीत काढतात.दोघांचं काम एकच,संपवणे.


हे तेच लोक आहेत जे काल परवा लेनिन चा पुतळा पडल्यावर बाप मेल्यासारखे रडत होते.त्या निर्जीव पुतळ्यात यांच्यावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळला की यांनी रडून रडून भोकाड पसरलेलं अन नैसर्गिकपणे आंबेडकरी लोक तेव्हाही पुतळा पाडण्याच्या घटनेविरुद्ध रान पेटवत होते.


निर्जीव लेनिनच्या पुतळ्यात कुणा कॉम्रेड भटजीने मंत्र तंत्र फुंकून प्राणप्रतिष्ठा केलेली का? जशी मूर्तीची करतात? संविधान सुद्धा टेक्स्ट आहे निर्जीव आहे.अशी मांडणी ठीक आहे.पण ते संविधान तुम्हाला मान्य आहे का साम्यवाद्यानो हा खरा प्रश्न आहे.तुम्हाला लोकशाही मान्य आहे का? हा खरा प्रश्न आहे.


कारण साम्यवाद्यांना हुकुमशाहीचे वावडे नाहीच,किंबहुना तीच योग्य असं त्यांचं मत आहे.एक डावा मित्र तर हुकुमशाही कशी लोकाभिमुख असते असे हिरीरीने मांडताना पाहिलाय मी.


संविधान फक्त टेक्स्ट आहे का? तो तुमच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे.साधंसुधं पुस्तक नाही ते.त्यात तुमचं स्वातंत्र्य आहे.ते जाळायचं मोडायचं की काय करायचं अर्थातच तो तुमच्या बुद्धीचा अन विचारांचा प्रश्न आहे.


आंबेडकरी तरुण कायम दोस्ती निभावत आला परंतु डावे कायम बदमाशी करत दगाफटका करत आले.अन तरीही हे शत्रुभाव मांडणी करू नका असं रेकत असतात.


'राज्य" सत्तेवर "धर्मसत्तेचा" अंकुश असला पाहिजे.धर्म म्हणताना त्यात येणारी आपली प्रतीके प्रतिमा टोटेम अनुस्यूत असतात.त्याच्याच आधाराने धर्म चालवला जातो. "राज्य सत्तेचा" जाहीरनामा असणारं "संविधान" त्याच्या खाली असणं हा तो संदेश देण्याची धडपड लोकांच्या लक्षात येत नाही,लोक मूर्ख आहेत असं वाटत असेल तर तो मुर्खपणा आहे.


तिसरा मुद्दा आंबेडकरी तरुणांचा आहे.हा सर्वात गंभीर मुद्दा आहे.व्यक्त होताना निवडलेली भाषा टोन आणि एकूणच मानसिकता ही तुम्हाला सतत आयसोलेट करत जातेय.भान नसणे आपण काय बोलते त्याचे परिणाम काय होतील याचे जराही गांभिर्य नाही.


आपण राग व्यक्त करून बोलून मोकळे होतो.सगळं रागाच्या भरात असतं पण त्या रागाची किंमत समाजाला चळवळीला चुकवावी लागते.काल तरडेने दलितांची माफी मागितली म्हणूनही जसं चुकीचं तसं आंबेडकरी म्हणवून घेणारेही काल बहुजन समाजाची बौद्ध समाजाची माफी मागा म्हणत बसलेले.


किती टोकाचा मूर्खपणा आहे हा? संविधानाची मालकी बहुजन बौद्ध समाजाला कुणी दिली आहे? एकदा आपण म्हणतो संविधान देशाचं आहे.सर्वांच आहे दुसरीकडे माफी देशाची मागायची देशातील समस्त जनतेची मागायची की फक्त ठराविक समाजाची? ही मांडणी करून आपणच त्याला मर्यादित करत नाही का?


एकतर ते मानत नाहीत,किंवा त्यावर आवाजही उठवत नाहीत हे खरं परंतु म्हणून आपल्याकडून अशी मांडणी करण्यात कोणता शहाणपणा आहे?
हे क्षुल्लक नाही.गंभीर आहे.जेवढा अधिकार तुमचा तेवढाच हिंदू मुस्लिम ख्रिस्ती पारशी जैन लिंगायत आदिवासी यांचाही आहे.हे कायम लक्षात ठेवा,अन या लोकांनाही तसे वाटायला लागू द्यात.


संविधान हे शेवटचा अन मुख्य बुरुज उरलेला आहे या देशात.बाकीचे स्तंभ कोसळून गेलेत किंवा शरण गेलेत.त्यामुळे हा बुरुज राखणे ही काळाची गरज आहे.तो राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.कारण त्याला असेच काहीतरी धर्म प्रतीके समोर आणून आव्हान उभे केले जाईल आणि लोकांना धर्म हवा की लोकशाही ? असा पेच समोर टाकला जाईल.


अर्थातच भोळ्या विवेकहीन भारतीयांना त्यात कशाला प्रायोरिटी द्यायची हे
आर्य मुघल पासून इंग्रजांपासून आताच्या राजकारण्यांना नीटपणे अवगत आहे.त्यामुळे विवेकवादी अन विशेषत:आंबेडकरी तरुणांची जबाबदारी मोठी आहे.


तुमचे मित्र कोण शत्रू कोण? सोशल मिडियात वावरताना तुम्ही कसे व्यक्त होताय हे सगळं मॉनिटर होत आहे.सगळं पकडलं जातं आहे.तुमच्या विरुद्ध वापरायला.तेव्हा आलेला क्षणिक राग थोडा नियंत्रणात आणायला शिका.


रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी बुद्धांनीच सांगितलं आहे.आपला रागच आपलं नुकसान करतो असं बुद्ध म्हणतात.मी म्हणत नाही.त्यातून काही शिकणार आहोत की नाही?


अश्लील गलिच्छ भाषा वापरता मग मूळ मुद्दा बाजूला पडून तुमच्या भाषेवरच सगळं आणलं जातं.त्यांना माहित आहे तुम्ही बरोबर आहात आणि ते चुकलेले आहेत.म्हणून तर ते तुमचेच कच्चे दुवे शोधतात अन आपले तरुण त्यांना ते आयते पुरवतात.घोडा लावणार गाढव लावणार आणखी काय काय लावणार असली तुमची भाषा..


बरं हे एकदा घडलं का? प्रत्येक मुद्यावर अगदी आपल्याच बांधवाचा खून होतो जीवन संपवलं जातं त्याचं जगणं नाकारलं जातं हिरावून घेतलं जातं पण निगरगट्ट लोक काय चालवतात तर तुमची चुकीची भाषा.हे म्हणायला ठीक आहे की आम्ही जगाला फाट्यावर मारतो पण हे आपल्यालाच समाधान देत मूळ समस्या न सोडवता तशीच खरवडत रडत राहण्यात काय अर्थ आहे? याला अंत होणार की नाही?


सुशिक्षित ना तुम्ही प्रकांड पंडित ज्ञानाचा महामेरू ज्यानी सर्वात जास्त पदव्या घेतल्या अशा महापुरुषांचे अनुयायी म्हणवून घेताय अन मग हे काय असं? का? एवढा टोकाचा विरोधाभास का? शिक्षणाने माणूस सुधारतो सुशिक्षित बनतो नैतिकता त्याला कळते म्हणतात मग शिकलेला आंबेडकरी तरुण असा का वागतो? आपण खरंच इतर समाजापेक्षा पुढारलेले आहोत काय? आपण विज्ञानवादी आहोत म्हणजे नेमकं काय आहे? हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे.


प्रस्थापितांना समजावत बसू नका,कन्व्हिन्स करू नका.ते दांभिक आहेत हुशार आहेत निगरगट्ट आहेत,त्यांना सगळं माहिती आहे.तुमच्यावर अन्याय अत्याचार होतोय,किंबहुना त्यांचेच बांधव करतात हेही कळतं पण त्यांना तेच तर हवं असतं.अन म्हणून तुम्हाला हे बदलणे गरजेचे आहे.


लक्षात ठेवा हुशार,श्रुड आणि बुद्धिमान समाज सत्तेत असतो सत्ता गाजवतो बुद्धीच्या जोरावर आणि मूर्ख बथ्थड लोक भांडत रडत खडत असतात गुलामीत.


आपण कुठे आहोत हे आपणच ठरवले पाहिजे.कारण आंबेडकरी तरुण डोळस आहे विचारी आहे तो काहीवेळेस रागाच्या भरात भरकटला असला तरी नक्कीच परत आपल्या "सम्यक मार्गावर" येईल अशी मला आशा नाही तर खात्री आहे.


सप्रेम जयभीम !


#Ambedkaritemusings