ढोकाळी बौद्धवाडा येथील गणपतीचे व्हायरल सत्य

By  Veer Bhagwat on 

सोशल मीडियामुळे प्रत्येकाला मनमुराद व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे. या स्वातंत्र्याचा आपण जबाबदारीनं वापर करतो आहोत का?
याचा सोशल मीडियावरच्या प्रत्येकानं गांभीर्याने विचार करायला हवा.

सोशल मीडियासारख्या ‘तत्काळ व्यक्त होण्याच्या’ माध्यमाचा वापर करणाऱ्या बहुसंख्य लोकांना कोणत्याही घटनेची पुरेशी माहिती घेऊन, त्याची सत्यासत्यता पडताळून मगच ती माहिती इतरांना द्यावी, असं त्यांना वाटत नाही.

एखादी घटना घडताक्षणी ती जगभर सगळ्यांना समजू शकणं ही सोशल मीडियाची सगळ्यांत मोठी ताकद आहे.परंतु त्या घटनेच्या सर्व बाजूंचा विचार न होता, खरंखोटं न तपासता ती समोर येणं ही सोशल मीडियाची सर्वांत मोठी मर्यादा आणि धोका सुद्धा आहे.

अशाच एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाजात खळबळ माजली आहे. ठाणे येथील ढोकाळी गावात गणपती उत्सवाच्या निमित्ताने तिथला बौद्धवाडा आणि पंचशील मित्र मंडळ लोकांचा चर्चेचा विषय होता.

वस्तीच्या बाहेरील मुख्यरस्त्यावर गणपती उत्सवानिमित्त अनेक होर्डिंग्ज लागले होते, त्या मध्ये एक होर्डिंग होतं,पंचशील मित्र मंडळ आयोजित, सार्वजनिक गणपती उत्सव 2019 - ढोकाळी बौध्दवाडा

कोणी तरी या होर्डिंगचा फोटो एडीट करून सोशल मीडिया मध्ये प्रसिद्ध केला.अनेकांनी या प्रकरणाची माहिती न घेता तो फोटो व्हायरल करायला सुरुवात केली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रातून टीकेची झोड उठली.

अनेकांनी अर्वाच्च भाषा वापरून ट्रोल केलं.तिथल्या स्थानिकांना शिव्यांचा भडिमार सुरू झाला.त्यांना गद्दार ठरवण्यात आलं, भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या शिकवणुकी विरुद्ध वागल्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार घालण्याची भाषा बोलण्यात येवू लागली.

आम्ही जागल्या टीमने या प्रकरणाच्या मुळाशी जायचं ठरवलं.सत्य काय आहे हे जाणून घेऊन या प्रकरणाचा उलघडा करायचा ठरलं.मी जबाबदारी घेऊन स्थानिकांना भेटून माहिती घ्यायचं निश्चित केलं.

मनात भीती होती, लोक कसे व्यक्त होतील? कदाचित चिडले असतील दुखावले गेले असतील कारण लोकांनी खूपच वाईट पद्धतीने त्यांना ट्रोल केलं होतं. कदाचित मारहाण सुद्धा करतील, पण प्रामाणिकपणे हातात घेतलेल्या कामामुळे आत्मविश्वास एकवटून भेट घेतली.आम्हाला या गोष्टीच्या मुळाशी जायचं होतं.सत्य शोधायचं होतं.अन ते लोकांसमोर आणायचं होतं.

बुद्धविहाराच्या बाजूला काही बैठी टुमदार घरं होती, विचारपूस करत असताना मनोज जाधव यांची भेट झाली. मी स्वतःबद्धल ओळख करून दिली.माझी माहिती सांगितल्यावर त्यांनी मला घरात बसून बोलू असं सुचवलं. इतर गप्पा चालू असतानाच विषयाला हात घातला.

त्यांनी दिलेल्या माहिती नुसार हा ढोकाळी गावाचा बौद्धवाडा आहे. वाढत्या शहरीकरणाच्या तडाख्यात ठाणे शहर इथपर्यंत येऊन पुढे वाढतच आहे. इथल्या मूळ बौद्धांनी त्यांच्याकडच्या अतिरिक्त जागा विकून टाकल्या, काहींनी घरं बांधून भाडेतत्वावर दिली आहेत.

मराठी माणसाची 'मुंबई' म्हणता म्हणता जशी परप्रांतीयांची झाली, तशाच प्रकारे हा बौद्धवाडा शंभर घरांचा झाला आणि केवळ सहाच घरं बौद्धांची उरली. मनोज जाधव हे तिथले सामजिक कार्यकर्ते आहेत.

त्यांनी पुढे सांगितले, आमची संख्या कमी असली तरी आंबेडकर जयंती मोठ्या दिमाखात साजरी करतो.आमच्या वस्तीतील इतर अबौद्ध लोक सुद्धा मोठ्याप्रमाणावर हिरीरीने सहभागी होतात.

आम्ही इथे फार गुण्यागोविंदाने राहतो.

काही वर्षांपासून हिंदू धर्मीय रहिवाशी गणपती उत्सव साजरा करु लागलेत. इथे छोटीमोठी मित्र मंडळ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. आमच्याही मित्र मंडळाचं नाव पंचशील मित्र मंडळ आहे. आमचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो.

मग मी त्यांना म्हटलं हे सगळं मान्य पण होर्डिंगवर आपल्या महापुरुषांच्या प्रतिमा छापल्याचे दिसून आले.?

त्यावर त्यांनी सांगितले, हि वस्तुस्थिती नाही. आम्ही सुद्धा बुद्ध - आंबेडकरी विचारांचे पाईक आहोत. सोशलमीडिया मध्ये आम्हाला शिव्या आणि बदनामीच्या मेसेजेसने फार घायाळ करून टाकलं आहे.

नातेवाईक फोन करून जाब विचारतायत. हे सगळं सांगत असताना त्यांचा घसा कोरडा व डोळे पाणावलेले जाणवत होते.आपल्याच बांधवांकडून यातनांची मालिका आम्ही सहन करतोय. आम्हाला कोणीच समजून घेत नाही. तुम्ही आलात ते बरं झालं मन मोकळं करता आलं. असं त्यांनी बोलून दाखवलं.

सोशल मीडियात कुणीतरी मुद्दाम बौद्ध समाजाला बदनाम करण्यासाठी अशा गोष्टी व्हायरल करत असावं.  बघा, जर आपल्या समाजातील एका ठिकाणचे लोक गणपती उत्सव स्वत:साजरे करायला लागले तर ते पाहून इतर ठिकाणी सुद्धा असा मेसेज जाऊ शकतो. कदाचित त्यांना तसे अभिप्रेत असावे.यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या बांधवांनी कोणत्याही गोष्टीची सत्यता नीटपणे तपासूनच ती गोष्ट सोशल मीडियात शेअर केली पाहिजे.

कारण लोकांनाही त्यावर बोलायचं असतं चीड राग व्यक्त करायचा असतो. बौद्ध समाजाला आयसोलेट करण्यासाठी अनेक मनुवादी लोक धडपडत आहेत. आपले काही बांधव अतिउत्साहीपणा दाखवतात आणि अशा लोकांच्या षडयंत्राला नकळतपणे बळी पडतात.

सत्य काय याचा शोध घेण्याची तसदी कुणी घेत नाही आणि जेव्हा घेतली जाते तोपर्यंत संबंधित लोकांचं जगणं मुश्किल करणाऱ्या पोस्टच्या मालिका सुरू होतात.आपलीच हकनाक बदनामी होते. आमच्या बाबत हा दुर्दैवी प्रकार घडला.वाईट वाटलं.

त्यांनी मला त्यांचं संपूर्ण घर दाखवलं आणि विचारलं, गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमांव्यतिरिक्त तुम्हाला काही आढळणार नाही. तपासून पहा काही चुकीचं सापडतं का?

अर्थात हे सर्व ऐकून,मला त्यांची बाजू समजली. मलाही वाईट वाटलं.एक सोशल मीडिया हा एकमेव आधार आहे.हे एकमेव प्रभावी माध्यम आहे.जे आपल्या हातात उरलं आहे.त्यामुळे त्याचा वापर आपण सर्वांनीच अतिशय जबाबदारीने आणि गांभीर्याने केला पाहिजे. भान बाळगूया.

     .......वीर भागवत....